पिंपरी (Pclive7.com):- झोपडपट्टीमधील लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये एक भिंत आहे जी पार करून त्यांच्या समस्या, गरजा समजून घेण्याचा प्रयत्न कधीच कोणी करत नाही. पण हीच भींत पार करून त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवन सगळ्यांसमोर मांडण्यासाठी विजयराज उमप या फिल्ममेकिंगच्या विद्यार्थ्याने भिंतीपलिकडचं जग हा माहितीपट बनवला. या माहितीपटाला नुकताच लखनऊ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार मिळाला आहे.
विजयराजने पुणे विद्यापिठातील माध्यम आणि संज्ञापन विभागातून मिडीया ऍन्ड कम्युनिकेशन स्टडिजमध्ये आपले पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केले आहे. या विभागात शिक्षण घेत असताना विजयराज वेळात वेळ काढून एका झोपडपट्टीमध्ये लहान मुलांना शिकवायला जात असे. या झोपडपट्टीमधील मुलांना शिकवत असताना त्याला तेथील समस्या निदर्शनास आल्या. तेथे राहणाऱ्या मुलांच्या पालकांसोबत त्याने वारंवार चर्चा केली आणि तेव्हा त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यानंतर विजयराजला या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांवर एक माहितीपट बनवण्याची कल्पना सुचली. सुरूवातीला तेथील लोकांनी त्याला सहकार्य केले नाही पण विजयराजने त्यांना समजावून सांगितले आणि त्यांना विश्वासात घेतले. यासाठी त्याने सोबत शिक्षण घेणाऱ्या त्याच्या वर्गमित्रांची मदत घेतली तसेच विभागातील शिक्षकांचे मार्गदर्शनही त्याला लाभले. याच मदतीच्या आणि मार्गदर्शनाच्या जोरावर त्याने हा माहितीपट बनवला आणि आता या माहितीपटाचे देशपातळीवरून कौतुक होत आहे.
भिंतीपलिकडचे जग या माहितीपटाने आतापर्यंत अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये विविध पुरस्कार पटकावले आहेत. त्यामध्ये कोलकाता चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट माहितीपट तसेच सर्वोत्कृष्ट आश्वासक दिग्दर्शक, अण्णाभाऊ साठे चित्रपट महोत्सव पुणे येथे सर्वोत्कृष्ट माहितीपट, भारतीय चित्रपट प्रकल्प चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर असे अनेक पुरस्कार या माहितीपटाला मिळाले आहेत.
याव्यतिरिक्त बांगलादेश आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, कोणार्क चित्रपट महोत्सव, मुर्शिदबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, मगध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, झारखंड स्वतंत्र चित्रपट महोत्सव, केरलम सिने चित्रपट महोत्सव, हजारीबाग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, जागतिक जागतिक कार्निवल चित्रपट महोत्सव, प्रतिबिंब चित्रपट महोत्सव अहमदनगर, कलाकारी चित्रपट महोत्सव इंदूर या महोत्सवांमध्ये या माहितीपटाची अधिकृत निवड झाली आहे.
हा माहितीपट बनविण्यामध्ये विजयराजला पार्थ बनपट्टे, श्रद्धा वीर, ओंकार जाधव, पंकज ढोके, हिमांशू खरे रनजित मोटे, विनय शिरवाळकर, हर्षवर्धन वैराळ, हर्षल वाळके, आकाश गोटीपमुल या त्याच्या वर्गमित्रांनी मदत केली आहे.