भोसरी (Pclive7.com):- मोठा गाजावाजा करत आणि ‘व्हिजन’ ठेवून राबविलेला भोसरी उड्डाणपूलाखालील अर्बन स्ट्रीट नागरिकांच्या उपयोगाचा ठरला नाहीच. एकीकडे करदात्या नागरिकांच्या खिशातील तब्बल 42 कोटी हुन अधिक रक्कम या अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली लाटण्यात आली. मात्र आता हाच अर्बन स्ट्रीट नागरिकांच्या जीवावर उठला आहे. शुक्रवारी रात्री भोसरीतील एका नागरिकाला याच अर्बन स्ट्रीटमुळे नाहक आपला जीव गमवावा लागला आहे. याचे पाप भोसरीचे ‘व्हिजनरी’ आमदार आपल्या माथी घेणार का असा सवाल आता उपस्थित केला जात आहेत.

भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली गेल्या चार वर्षापासून अर्बन स्ट्रीटचे काम सुरू होते. चांदणी चौकातील अर्बन स्ट्रीटसाठी उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या जागेच्या दोन्ही बाजूला छोटे कठडे बांधण्यात आले होते. अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली या ठिकाणी तब्बल 42 कोटीहून अधिक खर्च झालेला आहे. अर्बन स्ट्रीटचे काम सुरू असताना अचानक येथील स्थानिक आमदार आणि प्रशासनाने अर्बन स्ट्रीटचे काम रद्द केले. चांदणी चौकातील अर्बन स्ट्रीटचे काम अर्धवट सोडल्यामुळे दोन्ही बाजूचे कठडे, या कठड्यांचे लोखंडी गज बाहेर आलेले होते. ते तसेच पडून होते. याकडे आमदार आणि प्रशासनाने सोईस्करपणे दुर्लक्ष केले. याचा फटका मात्र शुक्रवारी एका निष्पाप जीवाला बसला असल्याचा आरोप केला जात आहे.

भोसरीतील गव्हाणे वस्ती परिसरात राहणारे दीपक बवले (वय ५४) हे शुक्रवारी रात्री आठ वाजता या अर्बन स्ट्रीट समोरील रस्त्याने जात असताना त्यांची गाडी मारुती शोरूम समोर स्लिप झाली आणि ते थेट या कठड्यांच्या बाहेर आलेल्या लोखंडी गजावर जाऊन पडले. हा लोखंडी गज बवले यांच्या छातीमध्ये आरपार घुसला. त्यात ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या पूर्वीही या लोखंडी गजांमुळे नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र आता हा अर्बन स्ट्रीट अक्षरशः नागरिकांच्या जीवावर उठला असल्याचा आरोप होत आहे.






















Join Our Whatsapp Group