पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने थेरगाव परिसरात गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाला एक तोळा सोन्याचा नेकलेस, द्वितीय क्रमांकाला आठ ग्रॅम सोन्याचा नेकलेस, तृतीय क्रमांकाला पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, चतुर्थ क्रमांकाला तीन ग्रॅम ठुशी, पाचव्या क्रमांकाला दीड ग्रॅमची नथ तसेच उत्तेजनार्थ ठुशी आणि स्पर्धेत भाग घेणारांसाठी प्रत्येकासाठी आकर्षक भेटवस्तूचे आयोजन करण्यात आले होते.
या गौरी गणपती स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्ष मा. सौ. विद्याताई चव्हाण, मा. सौ. वैशाली नागवडे (प्रदेश विभागीय अध्यक्ष) सौ. शितल हगवणे (पिंपरी चिंचवड जिल्हा निरीक्षक) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष मा. अजित गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर महिला शहराध्यक्ष मा. कविताताई आल्हाट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी तसेच देवमाणूस फेम अभिनेत्री अस्मिता देशमुख (डिंपल) व विनोद पुलावळे (आमदार जनार्दन गायकवाड) आदी उपस्थित होते.
प्रस्थाविक भाषणात सौ. मायाताई बारणे म्हणाल्या दोन वर्षे कोरोना काळात गेल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या धार्मिक सणांमध्ये महिलांना सहभागी होता आले नाहीत. त्यामुळे जास्तीत-जास्त महिलांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा म्हणून विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती. सदर स्पर्धेसाठी थेरगाव परिसरातील सुमारे पाचशे महिलांनी सहभागी होऊन उत्कृष्ट प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्व सहभाग घेतलेल्या महिलांचे सौ. मायाताई बारणे यांनी आभार मानले व विजेत्या महिलांचे अभिनंदन केले.
सदर कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्ष मा. सौ. विद्याताई चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महागाई विरोधात स्रियांनी आवाज उठविला पाहिजे. सात वर्षांपूर्वी गॅस सिलिंडर, भाजीचे व इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी होते आता त्यांचे भाव गगनाला भिडल्याने स्रियांनी भाजप विरोधात आंदोलन केले पाहिजे. तसेच सौ. हगवणे ताई, नागवडे ताई, आल्हाट ताई, श्री. गव्हाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच देवमाणूस फेम अभिनेत्री अस्मिता देशमुख व विनोद पुलावळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून प्रेक्षकांची मने जिंकली. विजेत्या महिलांमध्ये प्रथम क्रमांक सौ. स्वाती संजय शेळके यांनी मिळवला तसेच द्वितीय क्रमांक सौ. नंदा हनुमंत भिसे, तृतीय क्रमांक सौ. राजश्री मयूर गुंडगळ, चतुर्थ क्रमांक प्रिती संदेश भादेकर, पाचव्या क्रमांकाचे सौ. रुपाली प्रवीण तापकीर यांनी पटकावले. तसेच उत्तेजनार्थ सौ. शर्मिला अभिजित ओझरडे व सौ. अनिता राजु चव्हाण यांना मिळाले.
तसेच या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका सौ. मायाताई संतोष बारणे व माजी विरोधी पक्षनेते श्री. संतोष नागुभाऊ बारणे यांनी केले होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन प्रगती शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षकवृंद व जय गणेश पतसंस्थेचे सर्व कर्मचारी यांनी केले.