पिंपरी (Pclive7.com):- श्री संत ज्ञानेश्वर महाराज जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला करून द्यावा, या मागणीसाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या विरोधात वडमुखवाडी, चऱ्होली येथे भोसरी विधानसभा आम आदमी पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. १५ दिवसांत जलतरण तलाव चालू करा असा ‘अल्टिमेटम’ही यावेळी देण्यात आला.

गेल्या १ वर्षापासून जलतरण तलाव नियोजन आणि इच्छा शक्ती नसल्याने अधिकारी मंडळीकडून सर्व सामान्य नागरिकांना खुले केले नाही. याचा परिणाम जे जलतरण खेळाडू सराव करतात किंवा व्यायाम म्हणुन , विरंगुळा म्हणून जे जलतरण तलावाचा वापर करतात त्याची गैरसोय होत आहे. अशा सर्व तक्रार आम आदमी पार्टीकडे येत होत्या.
भोसरी विधानसभेचे कार्याध्यक्ष मंगेश आंबेकर ह्यांच्या मार्गदर्शनात आणि इम्रान खान तसेच दत्तात्रय काळजे ह्यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन घेण्यात आले.
यावेळी महिला अध्यक्ष स्मिताताई पवार आणि चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष यशवंत कांबळे ह्यांनी महानगरपालिकेच्या प्रशासनावर सडकून टीका केली. जर पुढील १५ दिवसात हे जलतरण तलाव सुरू नाही झाला तर आप तर्फे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. ह्याप्रसंगी अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. वाजिद शेख, ब्रह्मानंद जाधव, स्वप्निल जेवळे, नजनीन शेख, कदमताई, प्रसाद ताठे आदी कार्यकर्ते आंदोलनात उपस्थित होते.