पिंपरी (Pclive.com):- कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गोसेवा समिती पुणे आयोजीत करण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या भव्य राज्यस्तरीय देशी गोवंश प्रदर्शनामध्ये गीर, लाल कंदारी, खिलारी, डांगी अशा बाराहून अधिक जातीच्या देशी गाई पहायला मिळाल्या. तसेच भव्य तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन मोशी येथे पालकमंत्री गिरिश बापट यांच्या हस्ते झाले. मोशी येथील संत नागेश्वर उप बाजार आवारात कृषी उत्पन्न बाजार समिती, येथे दोन दिवस हे प्रदर्शन सुरू असणार आहे.
मोशी येथे संत नागेश्वर उपबाजार आवारामध्ये आज या महोत्सवाचे उदघाटन झाले. यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर नितीन काळजे, आमदार महेश लांडगे, मुख्य प्रशासक दिलीप खैरे, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच आदी उपस्थित होते.
या मेळाव्यामध्ये भारतातील देशी गाई पाहण्याची सुवर्ण संधी शेतकर्यांना मिळाली. तसेच अनेक आजार बरे करणारी देशी गो आधारित औषधे विक्री केंद्रे या ठिकाणी होते. जर्सी प्राण्या पेक्षाही जास्त दूध देणारी आपली भारतीय गाय गीर, थरपारकर, देवणी, लाल सींधी,साहिवाल, लाल कंधार, खिलार, पंगानूर आणि आदी जातीच्या गाई या प्रदर्शनात होत्या. अनेक जातीची देखणी वासरे देखील येथे होती.
याशिवाय प्रामुख्याने मुळशी, भोर, वेल्हा, मावळ तालुक्यातील नैसर्गिक सुवासिकर्ता प्राप्त झालेला इंद्रायणी आणि आंबेमोहोर सह राज्यातील अनेक प्रकारचे तांदूळ विक्रीसाठी या महोत्सवात ठेवण्यात आले होते.