पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागात काम करणारे प्राथमिक शिक्षक आणि सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना धन्वंतरी आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी घेतला. त्यामुळे शिक्षक दिनाच्या पूर्वसंधेलाच शिक्षकांना अनोखे ‘गिफ्ट’ मिळाले.

गेल्या आठ- दहा वर्षांपासून महापालिकेतील प्राथमिक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना अन्य विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे ‘धन्वंतरी’ योजना लागू करावी. यासाठी शिक्षक संघटनांनी मागणी लावून धरली होती. याबाबत आयुक्त शेखर सिंह आणि संघनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यावी आणि सकारात्मक तोडगा काढावा, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी केली होती. त्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, महापालिका भवन येथे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी शिक्षक संघटना आणि शिक्षण व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजय खोराटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र वादेवार, पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, शिक्षक संघटनेचे प्रा. मनोज मराठे आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या इतर विभागातील कर्मचारी/ अधिकारी यांच्याप्रमाणे प्राथमिक शिक्षण विभागाकडील कार्यरत शिक्षक / सेवानिवृत्त शिक्षकांना कार्यरत शिक्षकास ३०० रुपये व सेवानिवृत्त शिक्षकांस १५० रुपये मासिक सभासद वर्गणी कपात करण्यात येईल. त्याआधारे संबंधित कर्मचाऱ्यांना धन्वंतरी योजनेचा लाभ देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी २०१३ च्या धन्वंतरी स्वास्थ योजनेच्या धोरणामध्ये बदल करणेकामी वैद्यकीय विभागामार्फत मा. स्थायी समिती, मा. महापालिका सभा यांची मान्यता घेण्याकामी कार्यवाही प्रस्तावित करावी, असे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.
महापालिका शिक्षकांना धन्वंतरी योजनेचा लाभ मिळावा. या करिता गेल्या आठ ते दहा वर्षांपासून शिक्षक संघटना मागणी करीत आहेत. याबाबत अनेकदा प्रशासनाकडे आम्ही पाठपुरावा केला आहे. शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षक आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाकडून ‘गिफ्ट’ मिळाले असून, यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि सहकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच, महापालिका शिक्षक आणि सेवानिवृत्तांचे अभिनंदन करतो.– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा.
Tags: Dhanvantari YojanaMahesh LandgePcmc newsPimpri ChinchwadPimpri Chinchwad Municipal Corporation

























Join Our Whatsapp Group