पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी नुकताच त्यांच्या निवासस्थानी होमहवन केला होता. त्यानंतर भाजपाचे जुने निष्ठावंत नेते अमोल थोरात यांनी या होमहवन वरून आयुक्त शेखर सिंह यांच्यावर व्यंगचित्र काढून उपरोधक टीका करत ते व्यंगचित्र प्रसारमाध्यमांवर व्हायरल केले आहे. त्यांच्या या कृतीचा हेच का भाजपावाल्यांचे हिंदुत्व? असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुलभा उबाळे यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
त्यांच्या पक्षाचे पंतप्रधान यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या स्थापनेचा इव्हेंट देशभर करायला लावला, तसेच संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी होमहवन केलं, तेव्हा भाजपाचे हेच अमोल थोरात गप्प का होते? असा सवाल सुलभा उबाळे यांनी विचारला आहे.
..अन्यथा अमोल थोरातांनी आयुक्तांची माफी मागावी – सुलभा उबाळे
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांच्या राहत्या घरात होमहवन केला म्हणून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी अमोल थोरात यांनी त्यांच्यावर टीका केली. अमोल थोरात यांची वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्राच्या प्रमुखांमध्ये आहेत. त्यांच्या पक्षाचे पंतप्रधानांनी राम मंदिरच्या स्थापनेचा इव्हेंट देशभर करायला लावला. संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी होम हवन केला. तेव्हा अमोल थोरात गप्प का होते? म्हणजे धर्माच्या कामाचा ठेका यांनीच घेतला आहे काय? हेच एक हिंदू आहेत का? यांची हिंदुत्वावर मालकी आहे का? या देशात प्रत्येकाला आपापल्या मताप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य आहे. एवढीच जर आयुक्तांवर यांची नाराजी आहे, तर तुमचंच सरकार महाराष्ट्रात आहे. महापालिका तुम्हीच लुटत आहात. तशी चौकशीची मागणी करावी. अन्यथा अमोल थोरात यांनी आयुक्तांची माफी मागावी असं सुलभा उबाळे यांनी म्हटले आहे.