पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान मावळचे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी महायुतीचा उमेदवार मीच असणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. पिंपरीत आज ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मावळ लोकसभेत महायुतीचा उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. असे असतानाच शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मीच महायुतीचा उमेदवार असेल, असा विश्वास पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. परंतु कमळावर लढणार की धनुष्यबाणावर? यावर ही त्यांनी मीच महायुतीचा उमेदवार असेल असे म्हणत सस्पेन्स कायम ठेवला आहे.
श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आणि भाजपने ही विरोध दर्शविला आहे. पिंपरी चिंचवड भाजपने कमळावरचा उमेदवार असायला हवा, मग बारणे असले तरी आमची हरकत नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यालाच अनुषंगाने बारणे भाजपचे उमेदवार असतील, अशी चर्चा मावळ लोकसभेत सुरू होती. अशातच मीच महायुतीचा उमेदवार असल्याचे सांगत बारणे यांनी सस्पेन्स आणखीनच वाढवला आहे.
संजोग वाघेरेंचा मतदार संघात थांगपत्ता नाही..
मला गद्दार म्हणणारे संजोग वाघेरे हे स्वतः कोणत्या पक्षातून कुठे गेले? हे त्यांनी आधी पहावे. तर ज्या उमेदवाराचा मतदारसंघात थांगपत्ता नाही, त्या उमेदवाराबद्दल मी बोलणार नाही असं म्हणत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरेंची खिल्ली श्रीरंग बारणे यांनी उडवली आहे.