पिंपरी (Pclive7.com):- वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी आज सापळा रचून पकडले आहे. या आरोपीकडून एक पिस्टल व दोन राउंड देखील ताब्यात घेण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. अमोल जोतीराम घाडगे (वय-३४ वर्षे रा. कदमवस्ती, कोंडबावी, पो. अकलुज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्हे विभागाचे पोलीस उप आयुक्त संदिप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये कोणताही अनुचीत प्रकार घडू नये याकरीता फरारी व तडीपार आरोपी तसेच संशयीतांची तपासणी मोहिम सुरू आहे. गुन्हे शाखांच्या सर्व अधिकाऱ्यांना सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सुचना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिलेल्या आहेत.
त्यानुसार गुन्हे शाखेकडील खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे, सहा. पोलीस फौजदार रमेश गायकवाड, पोलीस हवालदार गणेश गिरीगोसावी व विजय नलगे यांना वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यात फरार असलेला आरोपी अमोल जोतीराम घाडगे याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून, अमोल घाडगे याला ताब्यात घेवुन, अटक केली. तपासादरम्यान त्याच्याकडे १ देशी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे (राऊंड) हस्तगत करण्यात आलेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उप-निरीक्षक सुनिल भदाणे, सहा. पोलीस उप-निरीक्षक रमेश गायकवाड, तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार निशांत काळे, गणेश गिरीगोसावी, विजय नलगे, सुनिल कानगुडे, किरण काटकर यांच्या पथकाने केली आहे.