पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या नेमक्या कोणाकडे जाणार यावरून गेल्या काही दिवसांपासून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. खासदार अमर साबळे आणि आमदार महेश लांडगे आपआपल्या समर्थकाची वर्णी लागावी म्हणून प्रयत्नशील होते. दरम्यान भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपले वजन जुने निष्ठावंत असलेले शितल शिंदे यांच्या पारड्यात टाकल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून समजते. त्यामुळेच स्थायीची लॉटरी शितल शिंदे यांनाच लागणार असल्याची चर्चा शहर भाजपच्या गोटात सुरू झाली आहे.
स्थायी समितीच्या नवीन ६ सदस्यांच्या निवडीला काही तासच शिल्लक राहिले आहेत. पूर्वी झालेल्या बैठकीत स्थानिक नेते आणि इतर मंडळीचे यावर एकमत झाले नव्हते. त्यामुळेच सदस्यांसह सभापती निवडीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला होता. त्यानुसार सर्वच स्थानिक नेतेमंडळींनी तशी फिल्डिंग लावली होती. सदस्यपदासह सभापती पदासाठी इच्छुक असलेल्या सर्वांनीच आज मुंबई गाठत मुख्यंमंत्र्याकडे साकडे घातले. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी सर्वांचेच म्हणणे ऐकून घेऊन जुन्या निष्ठावंतालाच न्याय देण्यावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यासह शितल शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे जुन्या निष्ठावंतांना न्याय द्यावा अशी मागणी केली. त्यास लक्ष्मण जगताप यांनीही सहमती दर्शविली असल्याचे समजते.






















Join Our Whatsapp Group