पिंपरी (Pclive7.com):- सोसायटीच्या गेटजवळ खेळत असताना लोखंडी गेट अंगावर पडल्याने एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बोपखेल येथे बुधवारी (दि.३१) रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली. गिरीजा गणेश शिंदे (रा. जिजाई निवास, गणेश नगर नंबर २, बोपखेल) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240624-WA00001-300x300.jpg)
गिरीजा हिचे वडील गणेश लक्ष्मण शिंदे हे खासगी नोकरी करतात. बुधवारी दुपारी कामावरून परतल्यानंतर गणेश हे घरात विश्रांती घेत होते. त्यावेळी गणेश यांचे वडील लक्ष्मण शिंदे, आई सुरेखा, पत्नी गार्गी आणि त्यांची दोन वर्षांची लहान मुलगी आदी घरात होते. त्यांची साडेतीन वर्षांची मुलगी गिरीजा ही घराबाहेर इतर लहान मुलांसोबत खेळत होती. त्याचवेळी गणेश यांच्या घराशेजारील एक लोखंडी गेट गिरीजा हिच्या अंगावर पडले. गेटखाली पूर्णपणे दबल्याने गिरीजा गंभीर जखमी झाली. गेट पडल्याबाबत एका मुलीने क्षणाचाही विलंब न करता गणेश यांना सांगितले. गणेश हे घरातून धावत आले. त्यांनी गेट बाजूला केले. जखमी गिरीजा हिला उचलून रुग्णालयात धाव घेतली. पिंपरी येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तिला दाखल केले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.