पुणे (Pclive7.com):- ताम्हिणी घाटातील आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र.753 एफ वरील रस्त्याच्या एका बाजूस अतिवृष्टीमुळे तडा गेला. त्यामुळे रस्ता खचला आहे. नागरिकांची सुरक्षितता तसेच दुर्घटना टाळण्याकरीता सोमवार (दि. 5) ऑगस्टपर्यंत सदरचा रस्ता बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
मौजे आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र.753 एफ वरील साखळी क्र.61/650 ते 61/680 दरम्यान रस्त्याला एका बाजूने अतिवृष्टीमुळे तडा गेला असून रस्ता खचलेला आहे. तसेच सदरचे ठिकाण हे ताम्हिणी घाट वन परिसर क्षेत्रात येते. रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे कामे सुरू असून वाहतूक सुरक्षितेच्या दृष्टीने उपाययोजनाही करण्यात येत आहेत.
पुढील काही दिवसात अतिवृष्टीमुळे हा रस्ता खचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या महामार्गावरुन नियमित वाहतूक ठेवणे धोकादायक आहे. तसेच शनिवार व रविवारी ताम्हिणी घाट परिसर क्षेत्रात पर्यटकांची गर्दी लक्षात घेवून राष्ट्रीय महामार्ग क्र.753 रस्ता बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240624-WA00001-300x300.jpg)