कामाचे श्रेय खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचेच – अजित गव्हाणे
भोसरी (Pclive7.com):- नाशिक फाटा ते चांडोली या ३० कि.मी. लांबीच्या ८ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या रु.७८२७ कोटी कामाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. याबद्दल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले आहेत. या कामाचे श्रेय घेण्यासाठी भोसरीकर आमदार सरसावले आहेत. मात्र या कामाचे खरे श्रेय हे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचेच असल्याचे अजित गव्हाणे यांनी म्हटले आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240624-WA00001-300x300.jpg)
चाकणची वाहतूक कोंडी हा अतिशय गंभीर व चिंतेचा विषय बनला होता. त्यामुळे खासदार डॉ. कोल्हे सातत्याने नाशिक फाटा ते चांडोली या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळावी यासाठी पाठपुरावा करीत होते. सध्या सुरू असलेल्या संसद अधिवेशनात त्यांनी केंद्रीयमंत्री गडकरी यांची भेट घेऊन तातडीने या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळावी असा आग्रह धरला होता. त्यावेळी लवकरच मंजुरी देण्याचे केंद्रीयमंत्री गडकरी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आज केंद्रीय मंत्रिमंडळाने नाशिक फाटा ते चांडोली या ३० कि.मी. लांबीच्या ८ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या रु.७८२७ कोटी कामाला मंजुरी दिली.
या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, नाशिक फाटा ते चांडोली या राष्ट्रीय महामार्गासाठी गेली ३-४ वर्ष अनेक पातळ्यांवर लढाई लढावी लागली. सततच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीयमंत्री गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी या एलिव्हेटेड कॉरिडॉरची निविदा प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे निवडणूक आचारसंहिता संपताच या एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम सुरू होईल अशी अपेक्षा असतानाच तळेगाव चाकण शिक्रापूर आणि पुणे शिरूर हे दोन एलिव्हेटेड कॉरिडॉर महाराष्ट्र राज्य इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे हस्तांतरीत करण्यात आले. त्यामुळे नाशिक फाटा ते चांडोली या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या भवितव्याविषयी शंका व्यक्त करण्यात येत होत्या. अशा परिस्थितीत मी हा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प मार्गी लागला नाही तर भावनांचा उद्रेक होईल ही बाब लक्षात घेऊन सर्वशक्तीनिशी प्रयत्न करीत या संसद अधिवेशनात केंद्रीयमंत्री गडकरी यांची भेट घेऊन कोणत्याही परिस्थितीत नाशिक फाटा ते चांडोली या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी देण्याची मागणी केली होती.
आज या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळाल्यामुळे माझ्या प्रयत्नांना यश मिळाल्याचा आनंद आहेच, पण त्याचबरोबर हा एलिव्हेटेड कॉरिडॉर झाल्यानंतर चाकणसह या महामार्गावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे याचे विशेष समाधान आहे. आता तांत्रिक बाबींची लवकरात लवकर पूर्तता करुन या एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम सुरू व्हावे यासाठी प्रत्येक मी टप्प्यावर पाठपुरावा करणार असून मतदारांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले आहे.
अजित गव्हाणे यांनी म्हटले आहे की, या कामाचे खरे श्रेय हे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचेच आहे. मात्र हे जणूकाही मीच केले असे दाखवत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी एक व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानत आपणच काम केले असल्याचे दाखवायचा प्रयत्न केला आहे अशी टीका अजित गव्हाणे यांनी केली आहे.