आज अखेर पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात डेंग्यु आजाराच्या निदानासाठी एकुण ४६७६ संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविले असता त्यामध्ये डेंग्यु आजाराचे ३९ रुग्ण दुषित आढळुन आलेले आहेत. तसेच झिका आजाराचे ०२ रुग्ण दुषित आढळुन आलेले असून या रुग्णांपैकी ०२ पुरुष व ० महिला रुग्ण आहेत. सदरचे दोन्ही रुग्ण वेगवेगळया खाजगी रुग्णालयामध्ये भरती असून दोघांची प्रकृती स्थीर आहे.
झिका व डेंग्यू हे एडिस डासांमार्फत पसरणारे विषाणुजन्य आजार आहेत.
झिका आजाराची चिन्हे व लक्षणे –
-
झिका हा आजार अगदी सौम्य स्वरुपाचा आहे. बहुसंख्य रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळत नसली तरी झिका आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंग्यू आजारा सारखी असतात.
-
यामध्ये ताप, अंगावर रॅश (पुरळ) उमटणे, डोळे येणे, खांदे व स्नायु दुखणे, थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो.
-
ही लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरुपाची आणि २ ते ७ दिवंसापर्यंत राहतात.
-
झिका आजारासाठी रुग्णालयामध्ये भरती होण्याची फारशी आवश्यकता भासत नाही. तसेच या आजारात मृत्युचे प्रमाणही नगण्य आहे.
-
गरोदरपणामध्ये झिका विषाणुची बाधा झाल्यास होणा-या अर्भकाच्या डोक्याचा घेर (Microcephaly) कमी होण्याची शक्यता असते.
उपाययोजना –
झिका आजार डासांमार्फत पसरणारा एक विषाणुजन्य आजार असल्यामुळे आपल्या घरात व आजूबाजूच्या परिसरात डास उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. याकामी घरात व आजूबाजूच्या परिसरात असलेल्या अडगळीच्या वस्तूंची यीग्य विल्हेवाट लावावी व पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
विशेषतः आपल्या घरात आजारी गरोदर महिला असल्यास त्वरित आपल्या नजीकच्या रुग्णालयात जाऊन तज्ञांचा सल्ला घ्यावा.
उपचार –
-
झिका आजारावर कोणतेही विशिष्ठ औषध अथवा लस उपलब्ध नाही.
-
रुग्णांवर लक्षणानुसार उपाय करणे आवश्यक असते.
-
पिंपरी चिंचवड मनपाच्या सर्व रुग्णालयांमध्ये झिका विषाणुच्या उपचाराकरीता आवश्यक मनुष्यबळ व औषधोपचार उपलब्ध आहेत.
-
उपरोक्त नमुद काही लक्षणे आढळल्यास तातडीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालय/दवाखाना येथे संपर्क साधावा.
डेंग्यू व झिका आजारास कारणीभूत असलेल्या डासांची उत्पत्ती केवळ १० मिली. पाण्यामध्ये सुध्दा होते याची कृपया नोंद घ्यावी. पावसाचे पाणी साठुन डासांची उत्पत्ती होऊ नये याकरीता कार्यवाही करावी. महानगरपालिकेतर्फे डेंग्यू व झिका रुग्णांच्या आजूबाजूच्या परिसरात पाच किलोमीटर अंतरात सर्वेक्षण करण्यात येत आहे.
तसेच महानगरपालिका वैद्यकीय विभागामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, डेंग्यू किंवा झिका सदृश लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय तज्ञांना दाखवून सल्ला घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.