पिंपरी (Pclive7.com):- कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त कलारंग कला संस्था व संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि.१५) ‘कलासंगम सोहळा २०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामध्ये पिंपरी चिंचवड परिसरातील कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील १५० हून अधिक कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती कलासंस्था व संस्कार भारतीचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मोरवाडी, येथे झालेल्या पत्रकार परिषदेला केतन लोंढे, दिनेश मारणे, सुमित काटकर, आशा नेगी, सुप्रिया धाईंजे, सरोज राव आदी उपस्थित होते.
चिंचवड, येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी सायंकाळी पाच वाजता हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी महापौर नितीन काळजे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर शैलजा मोरे, प्रसिद्ध कथक नृतक डॉ. नंदकिशोर कपोते, तेजश्री अडिगे, पालिकेचे सह शहर अभियंता प्रवीण तुपे, रविंद्र गांगुर्डे, गीता शर्मा, संदीप जाधव, संस्कार भारतीचे सतीश कुलकर्णी उपस्थित असणार आहेत.
अमित गोरखे म्हणाले, ”पिंपरी चिंचवड शहरातील सांस्कृतिक, साहित्य आणि कला क्षेत्रातील सर्वांना, ज्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून शहराच्या नावलौकीकात भर घालण्याचा प्रयत्न केला आहे. अशा सर्वांचा सन्मान ‘कलासंगम २०१८’ या कार्यक्रमात केला जाणार आहे. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात साहित्य, गायन, नृत्य, अभिनय, दिग्दर्शन, संगीत, चित्रकला, शिल्पकला, रांगोळी, निवेदन, छायाचित्रकार यासारख्या विविध क्षेत्रातील मंडळीचा सन्मान केला जाणार आहे. पिंपरी चिंचवड शहर केवळ औद्योगिक नसून कला, साहित्य व संस्कृतीने सज्ज असलेले शहर आहे, हे सिद्ध करण्यासाठी सर्वांना एकत्र जाणार आहे”.
साहित्य, कला आणि संस्कृती यांचा त्रिवेणी संगम म्हणजे कलासंगम कलासंगम कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील कलाकार आणि त्यांच्यासाठी काम करणा-या संस्थांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सांस्कृतिक मेजवानीसह विविध क्षेत्रातील तब्बल १५० पेक्षा जास्त कलाकारांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या १५ कलाकारांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील कलाकार एकाच मंचावर आल्याने पिंपरी चिंचवड शहराचा सांस्कृतिक लौकिक वाढणार आहे.
भाऊसाहेब भोईर, नंदकिशोर कपोते, प्रवीण तुपे, डॉ. सतिश गोरे, बाळ जुआटकर, राजन लाखे, सतिश वर्तक, किरण एवलेकर, तेजश्री अडिगे, संजय कांबळे, राज आहेरराव, वैशाली पळसुले, दत्तोबा पाचंगे, देवदत्त कशाळीकर आणि नाना शिवले यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.
यावेळी प्रभा एंटरप्रायझेस निर्मित पिंपरी चिंचवड मधील स्थानिक कलाकारांचा मराठी व गाणी, नृत्याचा कार्यक्रम होणार आहे.