पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या लिफ्ट मधून पडून एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. शरद भोंडवे असे या जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. भोंडवे यांच्या गुडघ्याला गंभीर इजा झाली असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.
पिंपरी महापालिकेतील उपमहापौर कार्यालयात शरद भोंडवे हे कार्यरत आहेत. दररोज प्रमाणे आज सकाळी ते कामावर आल्यानंतर तळमजल्यावरून ४ नंबरच्या लिफ्टने तिसर्या मजल्यावर येण्यास निघाले होते. यावेळी लिफ्टची लाईट अचानकपणे गेली आणि ते लिफ्ट मध्येच अडकली. त्यानंतर लिफ्टचा दरवाजा अचानक उघडला. शरद भोंडवे यांनी लिफ्ट मधून बाहेर पाय टाकला, पण लिफ्ट अर्ध्यातच असल्याने ते जमिनीवर कोसळले. त्यात त्यांच्या गुडघ्याला गंभीर इजा झाली. त्यांच्यावर खाजगी रुग्णलयात उपचार सुरू असून गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
महापालिकेतील मुख्यालयात एकूण ४ लिफ्ट आहेत. त्यातील एक महापौर,आयुक्त, नगरसेवक, पदाधिकारी तसेच पत्रकार यांच्या वापरासाठी आहे. अन्य तीन लिफ्टचा वापर कर्मचारी तसेच नागरिक करतात. परंतू अनेकदा या लिफ्ट दुरूस्तीच्या कारणास्तव बंद असतात. तसेच या लिफ्टमधे लिफ्टमन जागेवर नसल्याच्या तक्रारीही महापालिकेत येणार्या नागरिकांकडून होत आहे. आज झालेल्या अपघातामुळे या लिफ्टच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित रहात आहे.