पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे भाजप नगरसेवक संजय नेवाळे यांच्या विरोधात तोडफोड आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक अकराचे नगरसेवक संजय नेवाळे आणि अन्य सहा जणांनी दुकानाची तोडफोड करून दुकानातील व्यवस्थापकाला मारहाण केली. हा प्रकार रविवारी (दि.३) शिवतेजनगर येथे चेरी स्वीट मार्टमध्ये घडला.
बदाराम भिकाजी देवासी (वय २४, रा. चेरी स्वीट मार्ट, शिवतेजनगर, चिखली. मूळगाव पाली, राजस्थान) यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संजय नेवाळे, सचिन किरवे आणि अन्य पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवतेजनगर येथे चेरी स्वीट मार्ट हे दुकान आहे. या दुकानात बदाराम व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांनी दुकानासमोर चाटचा स्टॉल लावला आहे. हा स्टॉल दुकानासमोर लावायचा नाही असे नेवाळे आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी बदारामला सांगितले. बदाराम ही बाब आपल्या मालकाला फोनवरून राजस्थानी भाषेत सांगू लागला. त्यावेळी एका कार्यकर्त्याने बदारामला मारहाण केली. तो नेवाळे बाबत चुकीची माहिती मालकाला देत असल्याचे कार्यकर्त्याने सांगितले. यावरून सर्वांनी मिळून बदारामला बेदम मारहाण केली. तसेच दुकानाची तोडफोड केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.