पिंपरी (Pclive7.com):- एका सोनसाखळी चोराला त्याच्या साथीदारांसह वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख ४५ हजार रुपये किमतीचे आठ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. झटपट पैसे कमविण्यासाठी चोरीसारखे गुन्हे करत असल्याची कबुली दोन्ही चोरांनी दिली आहे. विशेष म्हणजे मुख्य आरोपी हा एका वृत्तवाहिनीचा पत्रकार असल्याची माहीती तपासात समोर आली आहे.
नसीम सादिक उस्मानी (वय ३२, रा. जगतापनगर, लेन नंबर पाच, थेरगाव) आणि मोहम्मद शराफत हुसेन अली (वय २४, मूळ रा.ग्राम-पोस्ट अफजलगढ, ता. धामपूर, जि. बिजानेर, उत्तर प्रदेश, सध्या रा. थेरगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, साखळीचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वाकड पोलिसांनी तपास पथक तयार केले. या पथकाने २९ मे रोजी साखळी चोरीच्या घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानुसार नसीम आणि मोहम्मद हे दोघे अॅक्टिव्हा मोपेड (एम एच १४ / जी आर ५४६८) वरून वाकड, थेरगाव आणि काळेवाडी परिसरात पायी चालत जाणा-या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेत असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार आरोपींवर कारवाई करत दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ८२ ग्रॅम वजनाचे २ लाख ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. यामुळे वाकड पोलीस ठाण्यातील तीन आणि सांगवी पोलीस ठाण्यातील दोन सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक करण्यात आलेला आरोपी नसीम हा अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष, एका संघटनेचा पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष आणि एका वृत्त वाहिनीचा पत्रकार म्हणून काम करत होता. त्याने आपला साथीदार मोहम्मद अली याला वेळोवेळी दिल्लीवरून बोलावून पिंपरी चिंचवड शहरात सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले आहेत. मोहम्मद अली याच्यावर दिल्लीमधील पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, तपास पथकातील विक्रम कुदळ, विजय गंभीरे, अशोक दुधवणे, प्रमोद कदम, विक्रांत गायकवाड, शाम बाबा, नितीन गेंगजे, मधुकर चव्हाण, बिभीषण कन्हेरकर, अनिल महाजन, सनी जोंधळे, महंमद नदाफ, धनराज किरनाळे, दादा पवार यांच्या पथकाने केली.