पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. भोसरीतील आदिनाथनगर भागात ८ दिवसांपूर्वी वाहनांच्या तोडफोडीची घटना घडली होती. त्याच ठिकाणी पुन्हा ८ गाड्यांची तोडफोड झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीसांचा वचक आहे की, नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दोन गटातील भांडणाच्या कारणावरून आठ दिवसांपूर्वी भोसरीतील आदिनाथनगर भागात १२ वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणातील काही आरोपींना भोसरी पोलिसांनी अटक केली होती. मात्र या घटनेला आठ दिवस उलटत नाही तोच पुन्हा आठ वाहनांची तोडफोड करण्यात आली. मात्र ही तोडफोड कोणी आणि किती वाजता केली याबाबत नागरिकांना माहिती नाही. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी भोसरी पोलीस दाखल झाले असून त्यांनी माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. येथील गुन्हेगारांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.