पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथील बंद फ्लॅटचे लॅच उचकटून सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह १ कोटीच्या मुद्देमालावर डल्ला मारणारा सुरक्षारक्षक (गोविंद परिहार, वय ३५, रा. नेपाळ) याला पोलीसांनी मध्यप्रदेशमध्ये अटक केली आहे. या सुरक्षारक्षकासह त्याच्या दोन साथीदारांनाही पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
निगडी परिसरातील भक्ती-शक्ती चौकाजवळ विनोद बन्सल यांचा फ्लॅट आहे. घरगुती कार्यक्रमासाठी घरातील सर्वजण बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत सोसायटीच्या सुरक्षारक्षकानेच बंद फ्लॅटचे लॅच उचकटून चोरी केली होती. ८० लाख रुपये किमतीचे दागिने आणि १७ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम, असा एकूण ९७ लाख २० हजार रुपयांचा ऐवज घेऊन तो पसार झाला होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाल्यामुळे पोलीसांनी सुरक्षारक्षक गोविंद परिहार (वय ३५, रा. नेपाळ) याचा तपास सुरू केला होता. त्यानुसार पोलीसांनी वेगवेगळी पथके त्याच्या मागावर रवाना केली होती.
आरोपी गोविंद परिहार हा मुळचा नेपाळचा असल्यामुळे त्याने चोरी केल्यानंतर नेपाळला पळून जात होता. मात्र मध्यप्रदेश येथील खंडवा स्टेशनवर पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलीसांनी त्याच्यासोबत असलेल्या दोन साथीदारांना मुद्देमालासह अटक केली असून हे पोलीसांचे पथक शहरात आल्यानंतरच अधिक माहिती मिळेल.