पिंपरी (Pclive7.com):- पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरांना जोडणाऱ्या मुळा नदीवरील हॅरिस पुलालगत आणखी दोन समांतर पूल बांधण्यात आलेत. गेल्या १ महिन्यापासून हा पूल बांधून तयार अाहे. मात्र पालकमंत्री गिरीश बापट यांची तारिख मिळत नसल्याने या पूलाचे उद्घाटन रखडले होते. अखेर आज रमजान ईदच्या मुहूर्तावर पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने या पूलाचे उद्घाटन करत, नागरिकांना ईदची भेट देण्यात आली असल्याचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील म्हणाले.
यावेळी नगरसेवक रोहित काटे, माई काटे, राजू बनसोडे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, उपाध्यक्ष विशाल काळभोर, संतोष वाघेरे, लाला चिंचवडे, तसेच मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पिंपरीकडून पुण्याकडे जाणारा पूल बांधून तयार आहे. एक मेपासून वाहनचालकांसाठी खुला करण्याचे महापालिकेचे नियोजन होते. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही सत्ताधारी भाजपाला जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही. भाजपच्या उदासिनतेमुळेच आज राष्ट्रवादीने हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला असल्याचे संजोग वाघेरे पाटील म्हणाले.
नगरसेवक रोहित काटे म्हणाले की, आमच्या प्रभागातील कामांकडे सत्ताधारी भाजपा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. हा पूल बांधून तयार असताना खुला केला जात नसल्यामुळे नागरिकांना मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. गेल्या महिन्यापासून पक्षनेते एकनाथ पवार यांना हा पूल खुला करण्याबाबत विनंती करत होतो. मात्र पालकमंत्र्यांची तारिख मिळत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत होते. म्हणूनच नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी आम्ही हा पूल आज खुला केला आहे.