‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ कार्यक्रमाच्या माध्यमातून अजितदादांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले..!
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दंड थोपटले आहेत. सलग पाच तास जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांची थेट संवाद साधल्यानंतर राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमाच्या माध्यमातून अजित पवार यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी मुक्तपणे चर्चा केली. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा शिलेदार म्हणून सर्वांनी एकजुटीने कामाला लागा अशा सूचना करत अजितदादा पवार यांनी रणशिंग फुंकले आहे.

२०१७ मध्ये झालेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. विकास कामे करूनही शहरवासीयांनी नाकारल्याची खंत अजितदादांनी अनेकदा जाहिरपणे व्यक्त करून दाखवली आहे. आता पुन्हा पिंपरी चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. त्याचाच भाग म्हणून आज सलग पाच तास ‘जनसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी शहरातील विविध भागात जाऊन पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मुक्तपणे संवाद साधला.

पिंपरी येथील आडवाणी धर्मशाळेत राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित पवार यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेऊन स्थानिक कामकाजासंदर्भात मागण्या व निवेदने स्वीकारून सर्वांच्या सूचना व मते नीट समजून घेतली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधत समस्यांवर सकारात्मक मार्ग काढू, असे आश्वासन दिले.

त्यानंतर रामनगर येथे आयोजित राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी मुक्त संवाद साधला. लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांना मार्गदर्शन केले. पक्षाचा शिलेदार म्हणून सर्वांनी एकजुटीने कामाला लागावे, असे आवाहन केले.

छत्रपती संभाजीनगरमधील साई मंगल बँक्वेट सभागृहात पार पडलेल्या राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमाच्या निमित्तानं अजित पवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी आपुलकीचा संवाद साधला. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकजुटीनं कामाला लागणं आवश्यक आहे, अशी सूचना केली. आपापल्या भागातील समस्या व अडचणी सोडवण्यासाठी दर आठवड्याला जनसंवाद कार्यक्रम आयोजित केला जाईल. त्यातून लोकांच्या प्रश्नांना उत्तरं मिळतील व विकासाला गती मिळेल, असं स्पष्ट केलं. त्याचबरोबर मनीष बबनराव काळभोर संपर्क कार्यालय, काळभोर नगर, चिंचवड येथे सुद्धा राष्ट्रवादी परिवार मिलन हा कार्यक्रम आनंदात संपन्न झाला.

























Join Our Whatsapp Group