पिंपरी (Pclive7.com):- प्रिय वाचक बंधू भगिनींनो.. आज आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, Pclive7.com हे आपले विश्वासार्ह न्यूज पोर्टल यशस्वी आठ वर्षांचा प्रवास पूर्ण करून नवव्या वर्षात पदार्पण करत आहे. हा प्रवास केवळ शब्दांचा किंवा बातम्यांचा नव्हता.. हा होता सत्यशोधनाचा, जबाबदारीचा आणि लोकांच्या विश्वासार्हतेचा प्रवास..!
आठ वर्षांचा प्रवास..
२०१७ मध्ये अत्यंत मर्यादित साधनसंपत्ती आणि मोठ्या स्वप्नांसह सुरू झालेलं Pclive7.com न्यूज पोर्टल आज पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात एक स्वतःची ओळख निर्माण करून बसलं आहे. आमचं उद्दिष्ट नेहमीच स्पष्ट होतं जलद, अचूक, निष्पक्ष आणि लोकाभिमुख पत्रकारिता.. या मूल्यांना जपत आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. या काळात आम्ही फक्त बातम्या दिल्या नाहीत, तर जनतेच्या भावना, मुद्दे, संघर्ष, यशोगाथा आणि बदल घडवणारे आवाज यांना व्यासपीठ दिलं आहे.
एका क्लिकवर लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे डिजिटल माध्यम..
पिंपरी चिंचवड शहर मावळ, चाकण परिसरात सर्वाधिक वाचकांच्या पसंतीचे न्यूज पोर्टल अशी आम्ही ओळख निर्माण केली आहे. या आठ वर्षाच्या प्रवासात व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून लाखो वाचक आमच्याशी कनेक्ट झाले आहेत. राजकीय घडामोडी असो, गुन्हेगारी क्षेत्रातील बातमी, सामाजिक क्षेत्र किंवा क्रीडा विश्वातील प्रत्येक महत्त्वाची बातमी आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एका क्लिकवर लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे पिंपरी चिंचवड शहरातील एकमेव डिजिटल माध्यम अशी ओळख आम्ही निर्माण केली आहे.
बदलते माध्यम, टिकणारी मूल्यं..
डिजिटल युगात प्रत्येक सेकंदाला बातम्या बदलतात, पण सत्य आणि पारदर्शकतेची गरज अजूनही तितकीच आहे. मोबाईलवर झपाट्याने फिरणाऱ्या अंगठ्यांपेक्षा, मनात घर करणाऱ्या बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे.
Pclive7.com ने नेहमीच विविधतेला महत्त्व दिलं आहे. ग्रामीण ते शहरी, सामान्य ते विशेष, स्थानिक ते राष्ट्रीय. आम्ही प्रत्येक आवाजाला महत्त्व देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण पत्रकारितेचा खरा अर्थ ‘जनतेसाठी जनतेचा मंच’ हाच आहे.
नवव्या वर्षात नवे संकल्प..
नवव्या वर्षात प्रवेश करताना आमच्यासमोर अनेक नवे संकल्प आहेत.
- स्थानिक प्रश्नांवर अधिक लक्ष केंद्रित करणे
- युवकांमध्ये जागरुकता निर्माण करणारे विशेष उपक्रम
- फॅक्ट-चेक आणि पडताळणी आधारित पत्रकारिता
- सकारात्मक बातम्यांवर विशेष लक्ष
यासोबतच, वाचकांच्या सहभागाने Pclive7.com अधिक सशक्त आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
तुमची साथ हीच आमची शक्ती..
हा प्रवास शक्य झाला तो तुमच्या विश्वासामुळे. तुम्ही वाचक म्हणून, टीकाकार म्हणून, मार्गदर्शक म्हणून सतत आमच्यासोबत उभे राहिलात. तुमच्यामुळेच आम्ही वाढलो, शिकत राहिलो.
आज नवव्या वर्षात पदार्पण करताना, आम्ही पुन्हा एकदा तुमचा विश्वास टिकवण्याचं वचन देतो. आमच्या चुका दाखवा, आमचं कौतुक करा, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्यासोबत उभं राहा.
Pclive7.com हे केवळ एक न्यूज पोर्टल नाही, तर जनतेच्या आवाजाचं, विचारांचं आणि सत्याच्या शोधाचं माध्यम आहे.
नवव्या वर्षात नव्या ऊर्जा, नव्या संकल्प आणि तुमच्या साथीसह आम्ही सज्ज आहोत.
सत्यासाठी, समाजासाठी, आणि तुमच्यासाठी..!
आपलाच,
संदेश पुजारी (संपादक)
Pclive7.com (पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज)