

पिंपरी (Pclive7.com):- राज्यात मतदार यादीतील घोळ आणि दुबार मतदारांच्या नावांवरून राजकारण चांगलेच तापले आहे. त्यात पिंपरी-चिंचवडमध्येही दुबार मतदारांचा मुद्दा पुढे आला असून भोसरी विधानसभा मतदारसंघात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १२ हजार दुबार नावे निदर्शनास आणून दिले आहेत. या दुबार मतदारांबाबत राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी निवडणूक यंत्रणेकडे तक्रार केली आहे.

राष्ट्रवादीचे माजी शहारध्यक्ष गव्हाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातील यादीत सुमारे १२ हजार दुबार नावे असल्याचे म्हटले आहे. त्याची यादी त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे सादर केली आहे. आगामी निवडणूक पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार यादीतील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. त्रुटी दूर न झाल्यास एकाच प्रभागात वेगवेगळ्या मतदार केंद्रावर दुबार व तिबार मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुबार मतदारांबाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही करावी. जेणे करून दुबार मतदारांबाबत योग्य कार्यवाही व मतदार यादीतील दोष टाळण्यास मदत होई, असे गव्हाणे यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे.

निवडणूक विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. विशेष टीम गठीत करून छाननीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार मतदार यादी शुद्धीकरण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ही केवळ प्राथमिक आकडेवारी असून प्रत्यक्ष छाननीनंतर फक्त भोसरी मतदारसंघाचा हा आकडा लाखभरांपर्यंत जाऊ शकतो. शहरात नोकरी-व्यवसायासाठी स्थलांतरित झालेले नागरिक इतर जिल्ह्यांत वास्तव्यास असूनही त्यांची नावे शहराच्या मतदार यादीत कायम आहेत. तसेच काही नावे मुद्दामून पुन्हा-पुन्हा टाकल्याचे दिसते. यामुळे मतदारसंख्येत कृत्रिम वाढ होते. राज्यभरातच मोठ्या प्रमाणावर दुबार नोंदी झालेल्या आहेत.– अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

























Join Our Whatsapp Group