पिंपरी (Pclive7.com):- सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून विरोधी गटातील नगरसेवक अथवा पदाधिकाऱ्यांना सभा, समारंभ अथवा विविध विकासकामांच्या उद्घाटनांमध्ये डावलण्याचा प्रकार पिंपरी चिंचवड महापालिकेत नवा नाही. मात्र, आता विरोधी पक्षनेता असलेल्या दत्ता साने यांनाही विकास कामांच्या उद्घाटनांमध्ये डावलले जात असल्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना खडसावले आहे.
महापालिका प्रशासनाच्या वतीने प्रभाग क्रमांक १ मध्ये गुरुवारी विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमांना विरोधी पक्षनेता म्हणून दत्ता साने यांना निमंत्रित करण्यात आले नाही. परिणामी, संतापलेल्या साने यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. महापालिकेचा शिष्टाचार (प्रोटोकॉल) काय सांगतो? तुम्ही राजकीय दबावाखाली काम करता काय? असा प्रश्न उपस्थित करुन संबंधित अधिकाऱ्यांच्या पक्षपाती कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
तसेच, गुरुवारी केल्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेत्यांना टाळण्यात आलेबाबत आपण सखोल चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही विरोधी पक्षनेता दत्ता साने यांनी केली आहे.