पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून मालमत्ता करावरील दंडात ९० टक्के सवलत देणारी ‘अभय योजना’ सध्या सुरू असून या योजनेची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ निश्चित करण्यात आली आहे. मात्र, या योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी या सदर्भात महापौर रवी लांडगे यांना निवेदन दिले आहे. यावेळी सचिव मनोज लांडगे, कामगार सेना प्रतिनिधी नितीन सुर्यवंशी, शाखाध्यक्ष सुधाकर अर्जुन, बंटी कांबळे आणि आजम शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश नागरिक हे कामगार वर्गातील असून त्यांचे पगार साधारणतः महिन्याच्या १० तारखेच्या आसपास होतात. त्यामुळे एकरकमी मालमत्ता कर भरणे अनेकांना शक्य होत नाही. तसेच झोपडपट्टीधारकांना कर भरण्यासाठी तीन ते चार हप्त्यांमध्ये रक्कम भरण्याची सुविधा द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर ‘अभय योजना’ची मुदत वाढवून अधिकाधिक नागरिकांना सवलतीचा लाभ मिळावा, अशी नम्र विनंती संबंधित पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.






















Join Our Whatsapp Group