पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक खेळाडू अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, मर्यादित साधनसामग्रीत आणि अथक मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. हे खेळाडू केवळ पदके जिंकत नाहीत, तर शहराचा मान उंचावत आहेत. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना पिंपरी-चिंचवड महापालिकेत थेट नोकरीत नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी भाजपा क्रीडा शहराध्यक्ष अरुण पाडुळे यांनी केली आहे.

तसेच राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना शिष्यवृत्ती योजना, अत्याधुनिक क्रीडा साहित्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याचीही मागणी त्यांनी निवेदनाद्वारे क्रीडा सभापती कैलास कुटे यांच्याकडे केली आहे.
यावेळी बोलताना अरूण पाडुळे म्हणाले की, “खेळाडूंना योग्य मार्गदर्शन, दर्जेदार प्रशिक्षण आणि सुविधा मिळाल्यास ते देशाचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल करू शकतात. आज खेळाडूंना आधार देणे म्हणजे उद्याच्या सक्षम भारताची पायाभरणी होय.”

या प्रसंगी क्रीडा सभापती कैलास कुटे, नगरसेवक कुंदन गायकवाड, योगेश लांडगे, उदय गायकवाड तसेच शाम जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. “खेळाडू घडले तर शहर घडते,” या भावनेतून शहरातील प्रत्येक खेळाडूच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, अशी बांधिलकी यावेळी व्यक्त करण्यात आली.






















Join Our Whatsapp Group