पिंपरी (Pclive7.com):- गांधर्व मंच संगीत स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. “गांधर्व मंचाला जगभर ओळख आहे; मात्र पीसीएमसीला जगात कोणी ओळखत नाही,” असे त्यांनी म्हटल्याने उपस्थित पत्रकारांनी तत्काळ आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २ एप्रिल ते ७ जून दरम्यान गांधर्व मंच संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संतपीठ परिसरात होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त, संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त तसेच गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या स्थापनेच्या १२५ वर्षांच्या निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मात्र, कार्यक्रमाची माहिती देताना आयुक्त सूर्यवंशी यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे वातावरण चांगलेच तापले. शहराच्या प्रतिमेबाबत नकारात्मक भूमिका दर्शविणारे हे विधान असल्याचा आरोप पत्रकारांनी केला. “पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक व शैक्षणिकदृष्ट्या प्रगत शहर असून, असे वक्तव्य अयोग्य आहे,” अशी भूमिका मांडत काही पत्रकारांनी निषेध नोंदवला. दरम्यान, आयुक्तांच्या या वक्तव्यावर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






















Join Our Whatsapp Group