पिंपरी (Pclive7.com):- मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या सराईत चोरट्याला वाकड पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक केली आहे. सचिन मानसिंग चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो पूर्वी पुणे शहर वाहतूक विभागात ट्रॅफिक वार्डन म्हणून कार्यरत होता.

८ एप्रिल २०२६ रोजी सकाळच्या सुमारास थेरगाव परिसरातील गणेश मंदिराजवळ दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने एका महिलेचे सोन्याचे मिनीगंठण हिसकावून नेले होते. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तपास पथकाने तातडीने कारवाई सुरू केली.

पोलिसांनी परिसरातील सुमारे १०० ते १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून आरोपीचा माग काढला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा मार्ग निश्चित करण्यात आला आणि हिंजवडी माण परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान आरोपीने दोन चेन स्नॅचिंगचे गुन्हे तसेच पुणे शहर परिसरातील एक वाहन चोरी केल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे, ट्रॅफिक वार्डन म्हणून काम करत असताना गैरवर्तणुकीमुळे त्याला सात महिन्यांपूर्वी नोकरीवरून काढण्यात आले होते.

तपासात असेही उघड झाले की, मार्च २०२६ मध्ये वाहतूक विभागाने जप्त केलेल्या वाहनांमधून त्याने एक होंडा ॲक्टिव्हा स्कुटर चोरली होती आणि त्याच स्कुटरचा वापर करून तो चेन स्नॅचिंग करत होता.

पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ४ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यामध्ये २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक मोटारसायकल आणि एक होंडा ॲक्टिव्हा स्कुटर यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे परिसरातील चेन स्नॅचिंगच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.



















Join Our Whatsapp Group