
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील पवना नदीतील वाढत्या प्रदूषणाच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला आता विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. तुकाराम भोंडवे यांच्या मागण्यांसाठी युवासेना चिंचवड विधानसभा उपशहरप्रमुख सागर एकनाथ शिंदे यांनीही आपला पाठिंबा दर्शविला आहे.

याबाबत सागर शिंदे यांनी माजी नगरसेवक तुकाराम भोंडे यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. त्या पत्रात नमूद केले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील नद्यांचे वाढते प्रदूषण ही अत्यंत गंभीर बाब असून नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न तातडीने सोडविणे आवश्यक आहे.

तसेच, शिवसेना नेते व खासदार श्रीरंग बारणे, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख गटनेते विश्वजीत बारणे आणि नगरसेविका सुलभा उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे सागर शिंदे यांनी म्हटले आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत ठोस व प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.

नदी प्रदूषणाविरोधात लढा देत असलेले माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहणार असल्याचा विश्वास सागर शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.




















Join Our Whatsapp Group