पिंपरी (Pclive7.com):- ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांनी पुकारलेल्या देशव्यापी मेडिकल बंदला पिंपरी-चिंचवड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या या संपात शहरातील तब्बल २ हजार ५०० हून अधिक मेडिकल दुकानदार सहभागी झाले होते. शहरातील बहुतांश होलसेल तसेच रिटेल औषध दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली.

या संपामुळे रुग्णांचे हाल होऊ नयेत यासाठी केमिस्ट असोसिएशनच्या वतीने विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आली. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आल्याचे केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे उपाध्यक्ष तसेच काळेवाडी-रहाटणी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विवेक तापकीर यांनी सांगितले.

संपाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांतील मेडिकल दुकाने बंद असल्याचे चित्र दिसून आले. ऑनलाईन औषध विक्रीमुळे पारंपरिक औषध विक्रेत्यांवर परिणाम होत असून, औषध विक्री प्रक्रियेत अनेक तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप केमिस्ट संघटनांकडून करण्यात येत आहे.

विवेक तापकीर यांनी सांगितले की, “पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्व होलसेलर आणि रिटेल औषध विक्रेत्यांनी एकजुटीने या बंदमध्ये सहभाग घेतला. संपूर्ण बंद शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.”

तसेच औषध व्यवसायाशी संबंधित विविध प्रलंबित मागण्या आणि ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल सर्व औषध विक्रेते, होलसेलर आणि रिटेलर यांचे आभारही त्यांनी मानले.




















Join Our Whatsapp Group