पिंपरी (Pclive7.com):- देशी दारू दुकानाच्या परवाना खरेदीच्या व्यवहारात ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायबा धनाजी बुचडे (वय ४९, रा. मारूंरी, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन शिवाजीराव माने (रा. हत्ती चौक, इचलकरंजी, जि. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, आरोपीने सरकारमान्य देशी दारू दुकानाच्या परवाना (अनुज्ञप्ती) १ कोटी २० लाख रुपयांना विकण्याचा व्यवहार ठरवला होता. त्यासाठी फिर्यादी व त्यांच्या साथीदारांकडून रक्कम स्वीकारण्यात आली. यामध्ये १२ लाख रुपयांचा धनादेश तसेच आरटीजीएसद्वारे काही रक्कम घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मात्र व्यवहार पूर्ण न करता संबंधित परवाना इतरांना विकल्याचा आरोप आहे. फिर्यादींनी पैसे परत मागितल्यानंतर आरोपीने १ लाख रुपये यूपीआयद्वारे परत केले, तर उर्वरित ११ लाख रुपयांसाठी दिलेले दोन पोस्ट-डेटेड धनादेश बँकेत सादर केल्यानंतर ते बाऊन्स झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पांचाळ करीत आहेत.





















Join Our Whatsapp Group