पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-२ अंतर्गत शाळा व महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ आणि सिगारेटची विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर विशेष कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एकूण १९ टपऱ्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड तसेच अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) बसवराज तेली यांच्या निर्देशानुसार ही कारवाई राबविण्यात आली.
परिमंडळ-२ मधील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने ही मोहीम पार पडली. त्यामध्ये पिंपरी पोलीस ठाणे हद्दीत ३, चिंचवड पोलीस ठाणे हद्दीत २, संत तुकाराम नगर पोलीस ठाणे हद्दीत ६, दापोडी पोलीस ठाणे हद्दीत ३ आणि सांगवी पोलीस ठाणे हद्दीत ५ टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संरक्षण आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ही कारवाई नागरीकांच्या आरोग्यास व सुरक्षितेस प्राधान्य देत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी अशा प्रकारची कारवाई यापुढेही प्रभावीपणे सुरु राहणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस उपआयुक्त संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने केली.




















Join Our Whatsapp Group