पिंपरी (Pclive7.com):- जुनी सांगवी परिसरातील मधुबन सोसायटी, लेन क्रमांक 4 येथे बुधवारी (दि. 26) सकाळी सुमारे 11.04 वाजण्याच्या सुमारास मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात एक महिला व तिच्या कडेवरील एक वर्षीय बालक जखमी झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला आपल्या एक वर्षाच्या बालकाला कडेवर घेऊन K.G. School (डॉल्फिन स्कूल) परिसरातून जात असताना अचानक एका मोकाट कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याने महिलेच्या पायाला चावा घेतला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्यांच्या कडेवरील बालक खाली पडले असून त्यालाही दुखापत झाली आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला असून याबाबत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, संबंधित विभागाकडून या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महानगरपालिकेने त्वरित कारवाई करून मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण आणावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आली आहे.




















Join Our Whatsapp Group