पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. शहरभर धार्मिक वातावरण निर्माण झाले असून विविध मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, पूजा-अर्चा आणि विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

रावेत येथील श्री कृष्ण मंदिरात बुधवारी मध्यरात्री बारा वाजता बाळकृष्ण जन्मसोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. टाळ-मृदुंगाच्या गजरात, भजन-कीर्तनाच्या सुरेल नादात आणि “गोकुळात आनंद भयो, जय कन्हैया लाल की” अशा जयघोषात मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.

बाळकृष्णाच्या जन्मक्षणाचे दर्शन घेण्यासाठी आणि जन्मोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी हजारो कृष्णभक्तांनी मंदिरात गर्दी केली होती. मंदिर परिसर आकर्षक फुलांची सजावट आणि रोषणाईने उजळून निघाला होता. जन्मसोहळ्यानंतर महाआरती, पूजा-अर्चा तसेच महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
यावेळी उपस्थित भाविकांनी एकमेकांना कृष्णजन्माष्टमीच्या शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा केला. भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे रावेत परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असून, श्रीकृष्णाच्या नामस्मरणाने संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते.






















Join Our Whatsapp Group