पिंपरी (Pclive7.com):- हिंजवडी आयटी पार्क व परिसरातील गंभीर समस्यांचे तातडीने निराकरण करावे. हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांभे, सांगवडे व गहुंजे परिसराचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत तातडीने समावेश करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना खासदार बारणे यांनी निवेदन दिले आहे.

हिंजवडी आयटी पार्क व परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विविध गंभीर समस्या निर्माण झालेल्या असून, या समस्यांमुळे देश-विदेशातील नामांकित आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे हजारो कर्मचारी, स्थानिक नागरिक तसेच दररोज या परिसरात ये-जा करणाऱ्या लाखो नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
हिंजवडी आयटी पार्कमधील रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, अतिक्रमणे, कचरा व्यवस्थापनाचा अभाव तसेच पायाभूत सुविधांची कमतरता यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

या संदर्भात मी गेल्या वर्षी स्वतः पीएमआरडीए आयुक्त यांच्यासोबत बैठक घेऊन हिंजवडी एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे, ज्या-ज्या चौकांमध्ये सातत्याने वाहतूक कोंडी होते. त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार उड्डाणपूल अथवा इतर वाहतूक उपाययोजना करणे, तसेच परिसरातील अतिक्रमणे हटविणे याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानंतरही या समस्यांवर अपेक्षित स्वरूपात ठोस कार्यवाही झालेली नाही. संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पत्रव्यवहार करूनही परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झालेली दिसून येत नसल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये देशभरातील मोठ्या आयटी कंपन्या कार्यरत असून, मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. मात्र, पायाभूत सुविधांच्या अभावामुळे या परिसराची ओळख आता वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या समस्यांसाठी होत आहे. दररोज सकाळी व सायंकाळी होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे कर्मचारी व नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाया जात असून, त्याचा परिणाम उद्योग आणि रोजगाराच्या वातावरणावरही होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मेट्रो लवकर सुरू करा..
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प हा या परिसरातील वाहतूक समस्येवर महत्त्वाचा उपाय ठरू शकतो. या मार्गाची चाचणी झालेली असतानाही प्रत्यक्ष प्रवासी सेवा अद्याप सुरू झालेली नाही. मेट्रो सेवा तसेच इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम आणि नियमित झाल्यास हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे मेट्रो सेवा लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देण्यात यावेत.
सर्व विभागांची संयुक्त बैठक घ्या..
हिंजवडी परिसरातील रस्ते, वाहतूक व्यवस्था, अतिक्रमणे, कचरा व्यवस्थापन आणि इतर नागरी सुविधांबाबत पीएमआरडीए, एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महानगरपालिका, वाहतूक पोलीस व संबंधित सर्व विभागांची संयुक्त बैठक घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. हिंजवडी आयटी पार्कसह हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांभे, सांगवडे व गहुंजे या झपाट्याने विकसित होत असलेल्या परिसराचा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समावेश करण्यात यावा, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.
नियोजनबद्ध विकास..
या परिसराचा पिंपरी-चिंचवड शहराशी सामाजिक, आर्थिक व दळणवळणाच्या दृष्टीने जवळचा संबंध आहे. या भागाचा महानगरपालिकेत समावेश झाल्यास रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य, पथदिवे, अग्निशमन, वाहतूक व्यवस्थापन व इतर आवश्यक नागरी सुविधा नियोजनबद्ध पद्धतीने उपलब्ध करून देणे शक्य होईल. या परिसराचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत समावेश करण्याबाबत महानगरपालिकेच्या स्तरावर ठरावही करण्यात आलेला आहे. त्यामुळे शासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहून प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कालबद्ध कृती आराखडा..
पीएमआरडीए, एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड महापालिका, मेट्रो प्रशासन, वाहतूक पोलीस व संबंधित सर्व विभागांची तातडीची संयुक्त बैठक आपल्या स्तरावर आयोजित करावी. या बैठकीमध्ये हिंजवडी आयटी पार्क व परिसरातील वाहतूक, रस्ते, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमणे, सार्वजनिक वाहतूक व इतर पायाभूत सुविधांच्या समस्यांवर कालबद्ध कृती आराखडा निश्चित करण्याबरोबरच सदर परिसर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट करण्याबाबत ठोस निर्णय घेण्यात यावा. हिंजवडी आयटी पार्क हे महाराष्ट्राच्या औद्योगिक व माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे या परिसरातील समस्या केवळ स्थानिक नागरिकांच्या नसून राज्याच्या औद्योगिक विकासाशी संबंधित आहेत. शासनाने याची तातडीने दखल घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी विनंती खासदार बारणे यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group