पिंपरी (Pclive7.com):- उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये एका तडीपार गुंडाने स्वतःच्या दिव्यांग पत्नीवर अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणामुळे शहरभर संतापाची लाट उसळली आहे. पीडित महिलेवर अत्याचार करून तिचे विद्रूपीकरण करण्यात आले तसेच त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि तडीपार आरोपी किशोर पवार याने आपल्या दुसऱ्या दिव्यांग पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिचे केस कापून तिला विद्रुप केले. एवढ्यावरच न थांबता आरोपीने महिलेला नग्न करून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ चित्रित करून ते सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले.
या अमानुष अत्याचारानंतर पीडित महिलेने पिंपरी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी किशोर पवार याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तडीपार आदेश असतानाही आरोपी शहरात मुक्तपणे कसा वावरत होता, दिव्यांग महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिच्यावर दबाव टाकून विवाह करण्यात आला होता का, तसेच अत्याचाराचे व्हिडिओ स्वरूपातील पुरावे उपलब्ध असतानाही आरोपीवर बलात्कारासारखे गंभीर गुन्हे का दाखल करण्यात आले नाहीत, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून गुंडांवर पोलिसांचा आणि कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.





















Join Our Whatsapp Group