पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्लूने पुन्हा डोके वर काढल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत शहरात एकूण ३७ रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यातच तब्बल ३१ रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यात एक, जुलैमध्ये पाच तर ऑगस्ट महिन्यात अचानक ३१ रुग्ण आढळून आले. सुदैवाने सर्व बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असून कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
गेल्या सहा वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास २०२२ मध्ये स्वाईन फ्लूचे सर्वाधिक ५८ रुग्ण आढळले होते. त्यावेळी ऑगस्ट महिन्यात ३४ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर २०२४ मध्ये १५ रुग्ण आढळले होते. आता पुन्हा एकदा स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आरोग्य विभागाने विशेष दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने नागरिकांनी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा, वारंवार हात स्वच्छ धुवावेत आणि सर्दी, खोकला किंवा तापाची लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले की, “स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली असली तरी सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरण्याऐवजी आवश्यक ती काळजी घ्यावी. लक्षणे आढळल्यास त्वरित महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावेत.”
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सर्व रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून स्वाईन फ्लूवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.




















Join Our Whatsapp Group