पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडमधील छत्रपती संभाजीनगर आणि शाहूनगर परिसरातील ‘जी ब्लॉक’मधील जुन्या व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आमदार अमित गोरखे यांनी २०२४ पासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) संचालक मंडळाने पुनर्विकास धोरणाला मंजुरी दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर व शाहूनगर परिसरातील ‘जी ब्लॉक’ हा भूखंड मूळतः औद्योगिक कर्मचाऱ्यांसाठी निवासी क्षेत्र म्हणून विकसित करण्यात आला होता. मात्र, येथील अनेक इमारती कालबाह्य व धोकादायक बनल्याने रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला होता. या पार्श्वभूमीवर आमदार अमित गोरखे यांनी १९ डिसेंबर २०२४ रोजी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित करून पुनर्विकासासाठी स्वतंत्र धोरण आखण्याची मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत एमआयडीसी संचालक मंडळाने १५ मे २०२६ रोजी झालेल्या बैठकीत ठराव क्रमांक ७२०४ अन्वये निवासी भूखंडावरील धोकादायक व जुन्या इमारतींच्या पुनर्विकास धोरणाला मान्यता दिली. या निर्णयामुळे CDCPR-23 मधील विनियम ६.४ नुसार ३० वर्षांहून अधिक जुन्या आणि धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्याचा मार्ग खुला झाला आहे.

तसेच, ३० वर्षांखालील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासावेळी सदनिकांच्या संख्येत वाढ आवश्यक असल्यास नियमानुसार आकारणी करून पुनर्विकास करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान उद्योग क्षेत्रातील तरतुदींप्रमाणे निवासी भूखंडांच्या पुनर्विकासासाठी सह-विकासक (Co-Developer) नियुक्त करण्यासही मान्यता देण्यात आली असून त्यामुळे पुनर्विकास प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार अमित गोरखे म्हणाले, “छत्रपती संभाजीनगर आणि शाहूनगर परिसरातील नागरिकांची ही अनेक वर्षांची प्रलंबित मागणी होती. जुन्या व धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित आणि आधुनिक निवास सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रश्न २०२४ मध्ये विधानपरिषदेत मांडला होता. त्यानंतर शासन आणि एमआयडीसी स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. आता पुनर्विकास धोरणाला मंजुरी मिळाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.”
ते पुढे म्हणाले की, “अनेक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या इमारतींचा प्रश्न आता मार्गी लागण्यास मदत होणार आहे. आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून पुनर्विकासाची कामे लवकर सुरू व्हावीत, यासाठी माझा पाठपुरावा कायम राहील.”
दरम्यान, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आमदार अमित गोरखे यांना पाठविलेल्या पत्राद्वारे एमआयडीसी संचालक मंडळाच्या निर्णयाची माहिती दिली असून, मंजूर धोरणाची अंमलबजावणी तातडीने करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर, शाहूनगर आणि ‘जी ब्लॉक’ परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, आमदार अमित गोरखे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना ठोस यश मिळाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. “नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि हक्काच्या घरांच्या पुनर्विकासासाठी पाठपुरावा सुरूच राहणार,” असा निर्धार आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केला.




















Join Our Whatsapp Group