पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या कचऱ्याच्या प्रश्नावरून आणि प्रशासनाच्या भूमिकेवर नगरसेवक ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. निवडून आल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षेनुसार कामे होणे अपेक्षित असताना, शहरात कचऱ्याचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पाण्याचे प्रश्न, कुत्र्यांचा त्रास आणि कचऱ्याची समस्या गंभीर रूप धारण करत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप..
कचऱ्याच्या प्रश्नी प्रशासनाचे लक्ष वेधत असताना, एनजीटी (NGT) अहवाल असो वा एमपीसीबी (MPCB) अहवाल, या दोन्ही महत्त्वाच्या मुद्यांवर प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप माऊली जगताप यांनी केला आहे. प्रशासनाने यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाबाबत प्रश्नचिन्ह..
शहरात सुरू असलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ (Waste to Energy) प्रकल्पातील एका चिमणी कोसळल्याची बाब समोर येत असून, हा प्रकार कागदावरच लपवला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. हा प्रकल्प नेमका किती दिवस बंद राहणार? यावर प्रशासनाने काय कारवाई केली? या प्रकल्पाला किती दंड ठोठावण्यात आला? आणि हा प्रकल्प पूर्ववत कधी सुरू होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने द्यावीत, अशी आक्रमक मागणी नगरसेवक माऊली जगताप यांनी केली आहे.
नगरसेवक आणि इतर प्रशासकीय यंत्रणांनी सकारात्मक भूमिका घेऊन प्रत्येक प्रभागात कचरा विलगिकरणाचे योग्य नियोजन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. परंतु, गेल्या ५० दिवसांपासून परिस्थिती बिकट होत चालल्याने प्रशासनाने आता टाळाटाळ न करता यावर तात्काळ पावले उचलत स्पष्ट खुलासा करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.





















Join Our Whatsapp Group