पिंपरी (Pclive7.com):- नामांकित ऑटो शोरूम कंपनीच्या मालकाचे बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार करून कंपनीच्या अकाऊंट एक्झिक्युटिव्हची फसवणूक करत तब्बल २ कोटी २० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या राजस्थानमधील तीन आरोपींना पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका ऑटो शोरूम कंपनीचे मालक आहेत. १४ ऑगस्ट २०२६ रोजी कंपनीच्या अकाऊंट एक्झिक्युटिव्हला एका व्हॉट्सॲप क्रमांकावरून संदेश प्राप्त झाला. त्या क्रमांकाच्या डीपीवर कंपनीच्या मालकाचा फोटो आणि नाव असल्याने त्यांनी त्यावर विश्वास ठेवून कंपनीच्या खात्याची शिल्लक माहिती दिली. यानंतर संबंधित व्हॉट्सॲप क्रमांकावरून विविध बँक खात्यांवर पैसे हस्तांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले. कंपनीच्या मालकांच्या नावाचा वापर करून विश्वास संपादन करण्यात आला आणि वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण २ कोटी २० लाख रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. पैशांची मागणी सतत वाढत असल्याने अकाऊंट एक्झिक्युटिव्हला संशय आला. त्यांनी थेट कंपनीच्या मालकाशी संपर्क साधला असता, त्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार करून फसवणूक केल्याचे उघड झाले.

याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान फसवणुकीतील काही रक्कम आयडीबीआय बँकेच्या एका खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले. हे खाते डोंबिवली येथील संचय पराग चव्हाण (वय २०) यांच्या नावावर असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पनवेल येथे वास्तव्यास असलेले रमेश कुमार शंकरलालजी पुनीया (वय २४) आणि प्रकाश गोरधनराम पंवार (वय २०) या दोघांना विविध बँक खाती उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली. हे दोघे मूळचे जोधपूर, राजस्थान येथील रहिवासी आहेत.
यानंतर सायबर पोलिसांनी पनवेल परिसरात शोधमोहीम राबवून रमेश पुनीया आणि प्रकाश पंवार यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी सायबर फसवणुकीसाठी विविध बँक खात्यांचा वापर केल्याची कबुली दिली. तसेच फसवणुकीतून मिळालेल्या रकमेपैकी काही रक्कम चेक आणि एटीएमद्वारे काढून घेतल्याचेही तपासात समोर आले. या प्रकरणात संचय चव्हाण, रमेश पुनीया आणि प्रकाश पंवार यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने तिघांनाही अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांच्या नेतृत्वाखालील सायबर पोलिसांच्या पथकाने केली. सायबर पोलिसांकडून या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून, फसवणुकीतील इतर आरोपी आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.





















Join Our Whatsapp Group