पिंपरी (Pclive7.com):- देहू ते आळंदी या महत्त्वपूर्ण मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी नगरसेवक यश साने यांच्यासह चिखली परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या शिष्टमंडळाने महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. यावेळी देहू-आळंदी मेट्रो मार्गाच्या प्रस्तावाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या शिष्टमंडळामध्ये ज्येष्ठ ग्रामस्थ अमृतआप्पा सोनवणे, प्रदीप भाऊ आहेर, निवृत्ती शेलार, विष्णु मोरे पाटील, बाळासाहेब मोरे, बाळासाहेब साने, मोहन ढोळ आणि रामभाऊ मोरे यांचा समावेश होता. बैठकीदरम्यान देहू ते आळंदी मेट्रो मार्ग सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांना होणारे विविध फायदे मांडण्यात आले. या मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, प्रवासाचा वेळ वाचेल तसेच संत तुकाराम महाराजांचे देहू आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी ही दोन प्रमुख तीर्थक्षेत्रे अधिक सुलभ आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्थेद्वारे जोडली जातील, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. यावेळी उपस्थित नागरिकांनी सध्या सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाची माहिती घेतली तसेच प्रत्यक्ष मेट्रो प्रवासाचा अनुभवही घेतला. परिसराचा सर्वांगीण विकास, नागरिकांच्या वाढत्या वाहतूक गरजा आणि भविष्यातील सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लक्षात घेऊन देहू-आळंदी मेट्रो मार्गाची मागणी महत्त्वाची असल्याचे नागरिकांनी नमूद केले.
देहू आणि आळंदी या धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहरांना मेट्रोद्वारे जोडल्यास परिसराच्या विकासाला चालना मिळण्यासोबतच हजारो भाविक आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.




















Join Our Whatsapp Group