पिंपरी (Pclive7.com):- प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथे दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात येणार आहे. आकर्षक व पसंतीचे वाहन क्रमांक मिळविण्यासाठी नागरिकांची होणारी गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी परिवहन विभागाने आगाऊ अर्ज स्वीकारण्याची तसेच लिलावाची प्रक्रिया जाहीर केली आहे.

नवीन दुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तीनपट शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. यासाठी २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. दुचाकी वाहनांसाठी उर्वरित आकर्षक क्रमांकांसाठी ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० या वेळेत अर्ज स्वीकारले जातील.
अर्जासोबत डीडी, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डाच्या साक्षांकित प्रती तसेच आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे. संबंधित डीडी राष्ट्रीयकृत किंवा शेड्युल बँकेचा, पुणे येथील देय असावा. चारचाकी वाहनांसाठी प्राप्त अर्जांची यादी ३ सप्टेंबर रोजी, तर दुचाकी वाहनांची यादी ४ सप्टेंबर २०२६ रोजी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल.

लिलावासाठी जास्त रकमेचा डीडी सादर करावयाचा असल्यास संबंधित अर्जदारांनी विहित वेळेत तो सीलबंद पाकिटात जमा करावा. सर्वाधिक रकमेचा डीडी सादर करणाऱ्या पात्र अर्जदाराला संबंधित पसंतीचा क्रमांक वितरित केला जाईल.
नोंदणी क्रमांक राखीव झाल्यानंतर तो बदलता येणार नाही. तसेच १८० दिवसांच्या आत वाहन नोंदणीसाठी सादर न केल्यास राखीव क्रमांक आपोआप रद्द होऊन भरलेली फी शासनजमा होईल. भरलेले आकर्षक क्रमांकाचे शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करता किंवा समायोजित करता येणार नसल्याचे पिंपरी चिंचवड परिवहन विभागाने कळविले आहे.





















Join Our Whatsapp Group