पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सर्व नवनिर्वाचित नगरसदस्यांसाठी महानगरपालिकेच्या वतीने अधिकृत आणि एकसमान स्वरूपाची ‘नगरसदस्य बॅच’ तयार करून उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेना नगरसदस्या ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महापौर रवि लांडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत नागरिकांनी विविध प्रभागांतून लोकप्रतिनिधींची निवड केली असून हे नगरसदस्य महापालिकेच्या सभागृहात तसेच विविध शासकीय, प्रशासकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नागरिकांचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे त्यांच्या अधिकृत ओळखीचे स्पष्ट आणि सुसंगत स्वरूप असणे आवश्यक आहे.
यासाठी महापालिकेने सर्व नगरसदस्यांना समान स्वरूपाची अधिकृत बॅच उपलब्ध करून द्यावेत. या बॅचवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकृत चिन्ह, ‘पिंपरी-चिंचवड महानगरपालिका’ आणि ‘नगरसदस्य’ असा स्पष्ट उल्लेख असावा. तसेच कोणत्याही पक्षभेदाशिवाय सर्व नगरसदस्यांना ही बॅच समान स्वरूपात देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या उपक्रमामुळे अधिकृत कार्यक्रम, बैठका, पाहणी दौरे आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नगरसदस्यांची ओळख सुलभ होईल. तसेच महापालिकेच्या लोकप्रतिनिधी व्यवस्थेला स्वतंत्र, सन्मानजनक आणि गौरवपूर्ण ओळख मिळण्यास मदत होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महापौरांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अधिकारी आणि विभागांशी समन्वय साधून बॅचची रचना निश्चित करावी व या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी विनंती नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group