पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत चिखली जलशुद्धीकरण केंद्र येथे नवीन २०० दशलक्ष लिटर क्षमतेच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी उच्चदाब वीजपुरवठा जोडणीचे काम गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात येणार असल्याने शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

महापालिकेच्या निवेदनानुसार, चिखली जलशुद्धीकरण केंद्राला उच्चदाब वीजपुरवठा करण्यासाठी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उच्चदाब वीजपुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात येणार आहे. कामगार आणि यंत्रणेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

याचा परिणाम बोऱ्हाडेवाडी, इंद्रायणीनगर, सेक्टर ४, ६, ९, ११ व १२, शिवरस्ता परिसर, चक्रपाणी वसाहत, धावडेवस्ती, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव, चोवीसावाडी तसेच अन्य परिसरांतील नागरिकांवर होणार आहे. या भागांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहील. तसेच शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होण्याची शक्यता असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
महापालिकेने नागरिकांना पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवण्याचे आवाहन केले असून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती केली आहे. पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता यांनी हे जाहीर निवेदन प्रसिद्ध केले आहे.




















Join Our Whatsapp Group