पिंपरी (Pclive7.com):- सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासापोटी पुणे-बेंगलोर महामार्गावर धोकादायक पद्धतीने रील शूट करणाऱ्या दोघांवर बावधन पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण करून महामार्गावर रील चित्रीकरण केल्याप्रकरणी दोन गाड्या जप्त करण्यात आल्या असून संबंधित दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी कोरी कार आणि फॉर्च्युनर वाहनाच्या साहाय्याने पुणे-बंगळुरू महामार्गावर रील शूट करण्यात येत होते. या चित्रीकरणादरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. तसेच महामार्गासारख्या व्यस्त आणि संवेदनशील मार्गावर अशा प्रकारचे चित्रीकरण करून स्वतःसह इतर वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण करण्यात आला होता.

या घटनेची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आल्यानंतर बावधन पोलिसांनी तातडीने दखल घेत कारवाई केली. पोलिसांनी गाडीमालक सोमनाथ अशोक केदारी तसेच ड्रोनच्या साहाय्याने चित्रीकरण करणारा अजय संभाजी यादव यांना ताब्यात घेतले. याशिवाय रीलसाठी वापरण्यात आलेल्या दोन्ही वाहनांवरही जप्तीची कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई केली जाणार आहे. महामार्गावर स्टंटबाजी, रील शूटिंग किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या प्रकारांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. या कारवाईमुळे सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी नियम धाब्यावर बसवणाऱ्या हुल्लडबाजांना चांगलाच धडा मिळाला असून, नागरिकांनीही अशा प्रकारांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





















Join Our Whatsapp Group