पिंपरी (Pclive7.com) : १६ नंबर ते बारणे कॉर्नर या महत्त्वाच्या मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली असून संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

या मार्गावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा होत असतानाही प्रशासनाकडून रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका वाढला आहे. अनेक ठिकाणी रस्ता खचल्याने चेंबर वर आले असून त्यामुळे वाहतुकीस गंभीर धोका निर्माण झाला आहे.
संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधत रस्त्याची तातडीने पाहणी करून सर्व खड्डे बुजवावेत आणि कायमस्वरूपी दर्जेदार डांबरीकरण करावे, अशी मागणी केली आहे. रस्त्याची दुरवस्था ही केवळ गैरसोयीची बाब नसून नागरिकांच्या जीविताशी संबंधित गंभीर प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

“नागरिक कर भरत असताना त्यांना खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करावा लागत असेल, तर प्रशासन नेमके कोणासाठी काम करते?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतरही प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने महानगरपालिका कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सतीश काळे यांनी दिला आहे.




















Join Our Whatsapp Group