पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे व्हॉट द मिडिया संस्थेच्या वतीने ‘शिवशैली’ या भव्य नृत्याविष्काराचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम, स्वराज्याची संकल्पना तसेच मावळ्यांप्रती असलेले प्रेम आणि महाराजांचे भावविश्व प्रभावी नृत्य, अभिनय, संगीत आणि नेत्रदीपक सादरीकरणाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर उलगडण्यात आले.

‘शिवशैली’ हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील विविध पैलू नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा एक अभिनव प्रयत्न ठरला. महाराजांच्या पराक्रमासोबतच त्यांची मावळ्यांवरील माया, स्वराज्याप्रती असलेली निष्ठा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील भावनिक बाजू नृत्य व अभिनयातून साकारण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन व्हॉट द मिडिया यांच्या माध्यमातून करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संचालक बुद्धभूषण बोदडे, ऋतुराज घरमोडे आणि विश्वजीत मोरे यांनी विशेष मेहनत घेतली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर व नगरसेवक योगेश बहल, नगरसेविका वर्षा जगताप आणि उपायुक्त अण्णा बोदडे ,डॉ उज्ज्वला अंदुरकर अधीक्षक यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल व डॉ शैलजा भावसार जेष्ठ वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.
‘शिवशैली’च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ ऐकवला किंवा सांगितला गेला नाही, तर नृत्य, अभिनय, संगीत आणि भावनांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांना अनुभवता आला. विशेषतः युवा पिढीने आपल्या गौरवशाली इतिहासाशी जोडले जावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, संस्कार व स्वराज्याची मूल्ये पुढे न्यावीत, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या भव्य सादरीकरणात एकूण २७ कलाकारांनी सहभाग घेतला. कलाकारांच्या प्रभावी नृत्याविष्काराने आणि अभिनयाने कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.
कार्यक्रमाच्या निर्मितीची जबाबदारी निर्माते ऋतुराज डाकवे आणि मोहित भेंडे यांनी सांभाळली. कार्यक्रमाचे दिग्दर्शन मानसी सदमते आणि सौरभ भिसे यांनी केले, तर लेखन विशाल साहेबराव निकम यांनी केले.
आचार्य अत्रे रंगमंदिरात रंगलेल्या या कार्यक्रमाला शिवप्रेमी, युवा वर्ग आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘शिवशैली’च्या प्रभावी सादरीकरणातून स्वराज्याचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व आणि मावळ्यांच्या त्यागाची गाथा प्रेक्षकांच्या मनावर ठसली.




















Join Our Whatsapp Group