पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची २ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली विशेष सर्वसाधारण सभा ही कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचा दावा करत माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी महापौर, महापालिका आयुक्त आणि नगरसचिव यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. ॲड. असीम सरोदे अँड असोसिएटेड एलएलपी यांच्या माध्यमातून ही नोटीस पाठविण्यात आली आहे.

योगेश बहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट २०२६ रोजी झालेली महापालिकेची सर्वसाधारण सभा अजेंडावरील सर्व विषयांवर चर्चा न करता १७ सप्टेंबर २०२६ पर्यंत तहकूब करण्यात आली होती. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, २०११ मधील तरतुदींनुसार तहकूब सभा ही मूळ सभेचाच भाग मानली जाते. त्यामुळे त्या सभेतील प्रलंबित विषय १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या तहकूब सभेतच चर्चेसाठी ठेवणे बंधनकारक असल्याचे बहल यांनी नमूद केले आहे.

मात्र, २० ऑगस्टच्या सभेतील प्रलंबित विषयांपैकी निवडक विषयांचा समावेश करून २ सप्टेंबर रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. २० ऑगस्टच्या विषयपत्रिकेत एकूण ३१ विषय होते, त्यापैकी १८ निवडक विषय विशेष सभेच्या अजेंड्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. हे विषय वेगळ्या सभेत मंजूर करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या तरतुदी व नियमांच्या विरोधात असल्याचा दावा नोटिशीत करण्यात आला आहे. एकाच विषयावर दोन वेगवेगळ्या सभांमध्ये कार्यवाही होऊ शकत नाही, अशी भूमिका बहल यांनी मांडली आहे. २० ऑगस्टच्या तहकूब सभेतील विषय २ सप्टेंबरच्या विशेष सभेत मंजूर केल्यास तहकूब सभेच्या अस्तित्वालाच अर्थ उरणार नाही आणि प्रशासनाच्या मनमानीला खतपाणी मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या पार्श्वभूमीवर २ सप्टेंबरच्या विशेष सभेच्या विषयपत्रिकेतून २० ऑगस्टच्या तहकूब सभेतील सर्व समान व ओव्हरलॅपिंग विषय तातडीने वगळावेत, अशी मागणी नोटिशीत करण्यात आली आहे. तसेच संबंधित विषय केवळ १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अधिकृत तहकूब सभेतच चर्चेसाठी ठेवावेत, अन्यथा न्यायालयीन मार्गाचा अवलंब केला जाईल, असा इशाराही योगेश बहल यांनी दिला आहे.




















Join Our Whatsapp Group