पिंपरी (Pclive7.com):- रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भोसरी येथील साई स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन करत तीन पदकांची कमाई केली आहे. प्राची अंधारे आणि समृद्धी भोईर या दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत अकॅडमीचे तसेच पिंपरी-चिंचवड शहराचे नाव उज्ज्वल केले.

प्राची अंधारे हिने ५००० मीटर चालणे (रेस वॉक) या प्रकारात दमदार प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. तर समृद्धी भोईर हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत एका प्रकारात रौप्यपदक आणि तिहेरी उडी (ट्रिपल जंप) प्रकारात कांस्यपदक मिळवून दुहेरी यश संपादन केले.
प्राची अंधारे आणि समृद्धी भोईर या दोन्ही खेळाडू गेली अनेक वर्षे भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंदिरानगर येथे साई स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून नियमित सराव करत आहेत. त्यांच्या या यशामागे प्रशिक्षक चंद्रशेखर कुदळे यांचे मार्गदर्शन आणि परिश्रम महत्त्वाचे ठरले आहेत. कुदळे यांनी आजवर अनेक गुणवंत खेळाडू घडविले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही खेळाडूंनीही सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धेत पदकांची कमाई केली आहे.

या यशाच्या जोरावर प्राची अंधारे व समृद्धी भोईर यांची ३७ व्या वेस्ट झोन ज्युनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा २७ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान गोवा येथे होणार असून दोन्ही खेळाडू राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून आगामी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्येही त्या उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




















Join Our Whatsapp Group